Wednesday, 20 January 2016

नववर्ष

कवेत घेऊन सूर्य कोवळा
नववर्षाचा नव दिन आला

साद घालतो गिरीशिखरातून
वाऱ्याच्या त्या मंद स्वरांनी
शिंपित येतो पानोपानी
मंद सुगंधित तो दव ओला

उठा उठा हो पृथ्वीवासी
नका म्हणू आलिया भोगासी
पळ पळ समजा दान सृष्टीचे
खेळ जुनाच, नव्याने खेळा

दु:ख , भ्रांत हे नित्य सोबती
त्यांच्यासाठी रडा कशाला
कुणी समजते जीवन रण हे
कुणी मानते त्यास प्रशाला

निमित्त कसले नववर्षाचे
तुमच्यासाठी रोज नवा मी
करा साजरा मनापासुनी
हास्य राहूदे अन साथीला

----श्री संजय माने ., महाड
      ९४२०३२४०२२
मराठी माय माझी 

नका बाळगू हो खंत वंचनेची
नको ती कदा भूमिका याचकाची
जिंके लीलया जी पैज अमृताची
ऐश्वर्यसंपन्न मराठी माय माझी

दुध वाघिणीचे जरी इंग्रजी ते
जरुरीच आहे हे दुध माउलीचे
लेकरांच्या भल्यासाठी उपेक्षाही सोशी
मोठ्या मनाची मराठी माय माझी

लौकिक साऱ्या जगतात आहे
अलंकार नाना जिच्या संग्रही
बाळगे कधी ना तमा ती कुणाची
गर्विता रुपाची मराठी माय माझी

कितीएक आल्या , किती लुप्त झाल्या
राजाश्रयाने तरल्या किती
भीती ना तिला हो कधी संपण्याची
श्वासात वसते मराठी माय माझी

----श्री . संजय माने ,महाड
       ९४२०३२४०२२
मार्ग यशाचा 

यश मिळते
जेव्हा श्रमतो मीही
मनापासुनी
हरणे ,उठणे याहून आणिक नसते काही

यश मिळते
जेव्हा पुसून ओळख
उतरतो रणी
येता अपयश
मीच एकटा धनी ,दुसरा कोणी नाही

यश मिळते
जेव्हा कळते मज
मर्यादा माझी
ओळख परक्यांची होते अन माझी मलाही

यश मिळते जेव्हा
आठवतो मी माझे स्नेही
त्यांच्यावाचून जमले नसते मजला काही

-----श्री . संजय माने ,महाड
            ९४२०३२४०२२
चर्वण 

चरता चरता बैल म्हणाला गाईला
घोळ कधी इतका नव्हता मी पहिला 
भा - गवताचे करिता चर्वण मी दाती 
छपन्न इंचांची झाली माझी छाती 
प्रश्न तरी हा सतावितो ग मज आता 
कशास माणूस म्हणतो तुजला गोमाता 
दुध ना वर्ज्य असो म्हैस वा असो गाढवी 
त्यांस ना म्हणतो माता,कोण त्याला अडवी
लज्जित होते रोज तयांची माता, मुलगी 
सहन कशाला करते तुही त्यांची सलगी 
नावच यांचे पहिले बघ प्राण्यांची यादी 
पशुत्व केवळ उरते यांचे पाहून मादी 
सारे प्राणी झाले आजवर भक्ष्य जयांचे 
तुझ्या रक्षणासाठी सैनिक दक्ष तयांचे
कळू न येता वळू कसे ते येईल आता 
गोमाता माता म्हणता म्हणता होतील "वळू "च आता … 

श्री . संजय माने , महाड ९४२०३२४०२२ 

Thursday, 6 March 2014

लोकशाही

लोकशाही

ठराविक लोकांनी
ठराविक लोकांसाठी राबवलेली
ठराविक लोकांची सत्ता
म्हणजे आमची लोकशाही

जिथे प्रामाणिकपणाचा बैल रिकामा
जिथे अडाणीपणाच येतो कामा
जिथे जातीयवादाला आरक्षणाचा मुलामा
ती म्हणजे आमची लोकशाही

जिथे आरोपांची खंत नाही
जिथे अपिलाना अंत नाही
जिथे आंदोलनांना उसंत नाही
ती म्हणजे आमची लोकशाही

युवा पिढी इंटरनेटच्या जाळ्यात फसली
मार्गदर्शक पिढी वृद्धाश्रमात बसली
बालकांची पिढी संस्काराला मुकली
आता कोण चालवणार हि आमची लोकशाही ?

कवी -- संजय माने ,महाड 

Thursday, 23 January 2014

चला लिहू या

चला लिहू या
शुभेच्छा द्यायच्या म्हटल्या
की लगेच एसएमएस पाठवतो आपण
मनातल्या भावना कधी कागदावरही उतरवू  या
मेल बॉक्स भरला की
जुने  एसएमएस डिलीट करतो आपण
आपल्या माणसांचे आपुलकीचे शब्द
पत्ररूपाने साठवू या
नेट वरल्या अनोळखी मित्रांशी
काहीबाही शेअर करतो आपण
आपल्या जगण्यातली सुख दुखः
आपल्या माणसांपर्यंत पोहोचवू या
आपल्या फोटोला किती लाइक्स आले
किंवा आपल्या फोटोवर किती कमेंट्स आल्या
यापेक्षा धीराचे चार शब्द आणि कौतुकाची थाप
आपल्या माणसा पर्यंत पोहोचवू या
इ मेलने निरोप सेकंदात पोहोचतात
पण माणसांमधल अंतर कमी नाही होत
चला लिहू या
माणुसकीचा ओलावा आणि पोष्टाची सेवा
दोन्ही चिरकाल जिवंत ठेवू या

कवी -- संजय माने ,महाड