Friday 30 December 2011

आदर्श

हे शिवराया,
सह्याद्रीच्या कडेकपारीत  फिरून  
स्वराज्यावर  पहारा दिलास खरा ,
पण रेशनच धान्य खाऊन
आमच्यात एव्हढी ताकद कशी यायची  ? 
नशीब रोप वे आहे म्हणून,
नाहीतर तुझी गाठभेट
फक्त पुस्तकातच व्हायची .
तुझं चरित्र वाचून
कधी कधी बाहुना  स्फुरण चढते,
पण "अहो नळाला पाणी आलंय" म्हणत 
बायको हाती बादल्या देते.

साहेबाच्या आदेशाशिवाय 
लेखणीही न चालविणारे कारकुंडे आम्ही,
तलवार काय चालविणार ? 
तुझ्यासारखा बंडखोरपणा 
आम्हाला नाही बुवा जमणार,
कारण मेलेलं मन हे 
नोकरीच क्वालिफिकेशन आहे,
देशाची चिंता करत बसणे ,
ऑफिसच्या नियमांविरुद्ध आहे.

यवनांना  तलवारीच  पाणी पाजून ,
तू तुझं नाव अजरामर केलंस,
पण आम्हीही काही कच्च्या गुरुचे चेले नाही,
बघ प्रत्येक खडकावर 
बदामाच्या आकारात ,
आमच्या प्रेयसींसह
आमची नावं आम्ही,
अजरामर करून ठेवलीत. 

कवी---- संजय माने, महाड 


Wednesday 28 December 2011

विश्वास ठेव ......

विश्वास ठेव ......
हे प्रितीच बंधन,
मी स्वत:हून  स्वीकारलंय,माझ्यासाठी.
आकाशगंगेत चमचमणा-या,हजारो ता-यां पैकी एक
हि ओळख मला नको आहे.
शतकानुशतके
पृथ्वीभोवती प्रदक्षिणा  घालणा-या
चंद्राचं निस्वार्थी प्रेम मला भावत
अमावस्या किंवा   ग्रहण
हा त्याचा दोष  नाही ,
गैर समजांच्या काळ्या पडद्याआड
पुनर्भेटीचीच  ओढ आहे.
ज्याचा शेवट गोड ,
ते सगळंच गोड आहे.


कवी.--- संजय माने ,महाड

Wednesday 21 December 2011

माझ सर्वस्व

                                                  हा चेहरा २२ डिसेंबर १९९७ रोजी रीतसर  माझ्या  आयुष्यात समाविष्ट झाला. जेमतेम वर्ष दोन वर्षापूर्वीची आमची ओळख .पण तेव्हढ्या काळात तिने माझ्या गुण अवगुणांचा अगदी बारकाईने विचार केला होता.वनिता विनायक जोशी हे नाव बदलून अनुराधा संजय माने हे नाव तिने पूर्ण विचारांती स्वीकारलं . जीवनसाथी म्हणून तिने माझा स्वीकार केला तेव्हाच मला पहिल्यांदा स्वत्वाची जाणीव झाली. त्या पूर्वीच माझ आयुष्य आणि आत्ताच माझ आयुष्य यात जमीन अस्मानाचा फरक आहे. माझ्या अस्तित्वाच पहिलं श्रेय निस्संशय माझ्या आईलाच आहे, पण आज मी जसा आहे तसा मला घडवण्याच सगळ श्रेय माझ्या पत्नीलाच जात. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही .मुळात जगण्यासाठी आवश्यक काय असत याचा मुळापासून विचार करायला तिने मला शिकवलं.
                                                  तिने मला शिकवलेल्या गोष्टींची यादी फार मोठी आहे. सगळ सांगण शक्य नाही, पण काही निवडक गोष्टी सर्वांशी शेअर करायला नक्कीच आवडेल.
                                                  माझ्यातल्या कित्येक सुप्त गुणांचा मलाही पत्ता नव्हता. कविता करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे असाच माझा समज होता. मात्र मनातल्या भावना मोकळेपणी शब्दात मांडण म्हणजेच कविता करणं हे तिने मला शिकवलं .त्यानंतर कितीतरी सहज सोप्या कविता माझ्या हातून लिहून झाल्या. चारोळ्या किंवा स्फुट कविता हे तर माझ्या आवडीच क्षेत्र झालंय.
                                                   एखाद्या गोष्टीचा ,घटनेचा चारही बाजूने विचार करणं संसारासाठी किती महत्वाच असत हे तिनेच मला पटवून दिलं.
                                                    माझ्या बोलण्यात आणि वागण्यात थोडा जरी फरक जाणवला तरी ती मला माझ वागण सुधारण्यासाठी सावध करते. माणूस म्हणून मोठ होण्यासाठी हि सवय सगळ्यात जास्त आवश्यक आहे अस तिचं मत आहे.
                                                     आपण एक स्त्री आहोत आणि स्त्रीचा सन्मान जपण्यासाठी आपण नेहमी सजग असल पाहिजे हि तिची जाणीव नेहमी जागृत असते.
                                                      आपल्या बायको बद्दल चार चौघांमध्ये चांगल बोलण्यासाठी पुरुषाला नेहमीच धीर गोळा करावा लागतो. पण बायका मात्र आपल्या नव-या   बद्दल तोंड भरून बोलत असतात. माझी बायकोही त्याला अपवाद नाही.
                                                      आमच लग्न झाल तेव्हापासून ते आजपर्यंत तिने माझ्या साठी खूप कष्ट घेतले आहेत. तिला ज्या गोष्टींची सवय नव्हती त्या गोष्टी तिने शिकून घेतल्या .माझ्या कित्येक चुकींचा तिला मनस्ताप झाला ., तोही तिने सहन केला. मला आणि  मुलांना थोडासुद्धा त्रास होऊ नये याचाच ती सतत विचार  करत असते.
                                                      कोणताही माणूस परिपूर्ण असू शकत नाही. हे मान्य करून तिने मला सर्व गुणदोषांसकट स्वीकारलं आहे. आजचा हा छोटासा लेख तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच लिहिला आहे.
-------संजय माने,महाड                                            
    

Tuesday 20 December 2011

विचारी मना .......


                   रिकाम मन हे सैतानाचं घर असत अस म्हणतात. अर्थात हा सैतान दुसरा तिसरा कुणी नसून  केवळ विचार असतात. पण  विचार फक्त वाईट असतात अस कुठे असत. ? विचार हे अनेक प्रकारचे असतात. काही विचार चांगले असतात.काही वाईट.पण त्यातही गम्मत आहे. चांगल्या आणि वाईट विचारांमधेही फक्त आपल्यासाठी चांगले ,किंवा आपल्यासाठी वाईट असाही प्रकार असतो. आणि आपल्यासाठी चांगले असलेले विचार दुस-या  साठीही  चांगले असतीलच असे नाही. अगदी त्याच्या उलट आपण दुस-यासाठी करत असलेला वाईट विचार आपल्या दृष्टीने चांगलाच असतो की. अगदी खर सांगायचं झाल तर प्रत्येक वेळी या चांगल्या -वाईट विचारांमध्ये आपल्याला नेमका फरक करताच येत नाही.आणि त्याच कारण स्वार्थ हेच असत. प्रत्येक विचाराचा  आपण आपल्या हिताच्या दृष्टीने अर्थ लावत असतो. अथात हि मानवी प्रवृतीच आहे. असो. पण या चांगल्या आणि वाईट विचारांशिवाय  आणखीहि काही विचार आपल्या मनात येत असतात. या विचारांचा आपल्या आयुष्याशी संबंध असतोच असे नाही. कित्येक वेळा हे विचार विधायक ठरतात तर कधी विध्वंसक. रिकाम्या मनाला आपण सैतानाच घर म्हणतो तेव्हा आपण केवळ या विध्वंसक विचारांनाच विचारात घेतो. थोर शास्त्रज्ञ न्यूटन जेव्हा झाडाखाली नुसताच पडून खाली पडणा-या  सफरचंदाचा विचार करत होता तेव्हा त्या विचारांनी विधायक रूप घेतल आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला .हे सगळ लिहिण्याच कारण हेच की माझ्याही मनात असेच विधायक विचार येत राहिले आणि मला एक नवीन शोध लागला.
   रिकाम मन हे देवाचं घरसुद्धा  असत.!
------------संजय माने, महाड 

Monday 5 December 2011

अण्णा हजारे आगे बढो (अ )हम तुम्हारे साथ हैं


अण्णा हजारे आगे बढो (अ )हम तुम्हारे साथ हैं
                    अण्णा तुमच्या आंदोलनाला आमचा नुसता पाठीम्बाच नाही तर आमचा सक्रीय सहभाग आहे.आज  तुमच्या मुळे आम्हाला उपोषणाची ताकद कळली .आणखी एक गोष्ट तुमच्या उपोषणामुळे झाली ,कुपोषण ,गुंडगिरी ,प्रदूषणामुळे होणारा पृथ्वीचा र्र्हास ,मुलींचा घटता जन्मदर ,महागाई, असे सर्वच विषय आता फिके वाटू लागलेत. 
                         तुमच ते लोकपाल कि काय ते बिल लवकर यायलाच हव . म्हणजे मीपण सगळ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांना सळो कि पळो करून सोडेन .अहो हे पोलिसवाले इतके हैराण करतात आम्हाला,तो धोनी, जाहिरातीत एका मोटार सायकलवर आठ दहा मुलांना घेऊन फिरतो, पण आम्ही तीन सीट घेतल्या तर लगेच फाइन मारतात. एम एस इ बीच्या ऑफिस मध्ये सुद्धा अनेकदा विनंती केली कि आमचा मीटर स्लो करून द्या तरी ऐकत नाहीत. आमच्या घरी इस्त्री, गिझर ,टीवी, फ्रीज सर्व काही आहे. वीज बिल भरणे परवडत नाही हो. मागे आमच्या घराजवळ रस्त्याचे काम सुरु होते. मी त्या मजुरांना म्हटले ५०० रुपये देतो, एखादा ट्रक खडी बागेतल्या रस्त्या साठी टाका, तर त्यांनी सरळ सरळ नकार दिला. अण्णा तुमच लोकपाल बिल आल कि या सगळ्यांना धडा शिकवेन, मी आमच्या गावातला अण्णा हजारे म्हणून फेमस झालो कि हे सगळे जण आपोआप सहकार्य करायला लागतील.
अण्णा, तुमच्यावर टीका करणारे म्हणतात कि अहंम तुम्हारे साथ हैं. पण तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष्य देऊ नका. एव्हढे लोक आंदोलनाला साथ देतात म्हटल्यावर अहम येणारच. काही लोक म्हणतात कि अण्णांनी लोकपालाच्या आग्रह ऐवजी आहेत ते कायदे कठोरपणे राबवण्यासाठी चळवळ सुरु करायला हवी.पण अण्णा तुम्हीच सांगा हे कस शक्य आहे ? कायदे कठोरपणे राबवले तर लोकांना त्रास नाही का होणार ? त्यापेक्षा सरकारी बाबुना त्रास दिलेला केव्हाही चांगलाच नाही का ? 
जय  हिंद !