Friday, 30 December 2011

आदर्श

हे शिवराया,
सह्याद्रीच्या कडेकपारीत  फिरून  
स्वराज्यावर  पहारा दिलास खरा ,
पण रेशनच धान्य खाऊन
आमच्यात एव्हढी ताकद कशी यायची  ? 
नशीब रोप वे आहे म्हणून,
नाहीतर तुझी गाठभेट
फक्त पुस्तकातच व्हायची .
तुझं चरित्र वाचून
कधी कधी बाहुना  स्फुरण चढते,
पण "अहो नळाला पाणी आलंय" म्हणत 
बायको हाती बादल्या देते.

साहेबाच्या आदेशाशिवाय 
लेखणीही न चालविणारे कारकुंडे आम्ही,
तलवार काय चालविणार ? 
तुझ्यासारखा बंडखोरपणा 
आम्हाला नाही बुवा जमणार,
कारण मेलेलं मन हे 
नोकरीच क्वालिफिकेशन आहे,
देशाची चिंता करत बसणे ,
ऑफिसच्या नियमांविरुद्ध आहे.

यवनांना  तलवारीच  पाणी पाजून ,
तू तुझं नाव अजरामर केलंस,
पण आम्हीही काही कच्च्या गुरुचे चेले नाही,
बघ प्रत्येक खडकावर 
बदामाच्या आकारात ,
आमच्या प्रेयसींसह
आमची नावं आम्ही,
अजरामर करून ठेवलीत. 

कवी---- संजय माने, महाड 


No comments:

Post a Comment