Saturday, 4 August 2012

चारोळी
स्पंदनांचे जाळे  , फेकुनी आकाशी
स्वप्नांचे थवे घे तू ,ओढुनी  उराशी
तिमिरास  तेजाची  ,दावूनी लकाकी
तुझ्या साठी उषा आली ,हास ना जराशी

----संजय माने ,महाड 

जगेन मी

हसून साह्शील सहज वेदना
दु:खlला  सुख म्हणेन मी

तू चंद्राला दिनकर म्हणशील
तुझ्यासवे "मम" म्हणेन मी    

अर्थ नवा नात्याला देशील
श्वासाविनही जगेन मी  

स्वप्नांमध्ये रंग तू भरशील
नेत्रांविनही बघेन मी   

मागून बघ तू सहज एकदा  
चंद्र धरेवर  आणेन मी

प्रीतीस म्हणते नश्वर दुनिया 
सखी तुला मग  म्हणेन मी

---संजय माने ,महाड 

Saturday, 7 January 2012

चारोळ्या

धन्य त्या शिवबाची
ज्याने प्राण देशासाठी वाहिला,
आम्ही मात्र जितेपणी
देश गुलाम होताना पाहीला.
----------------------------------------
इथल्या चिरेबंदी दगडांनी
इतिहासाची जुळणी केली,
भूखंड खाऊन पुढा-यांनी
इतिहासाची गुळणी केली.
----------------------------------------
जनतेचाच पैसा खाऊन
वर "कोण म्हणतो येणार नाय "
लोकशाहीच कवच पांघरून
कासव घेतो पोटात पाय.
----------------------------------------
कवी -- संजय माने ,महाड 

माझं स्वप्नं

मी पाहतो नेहमी
एक स्वप्नं जागेपणी
तीच तू , तोच मी ,
डोळ्यातून बोलणारी ,
स्पर्शातून फुलणारी ,
ती प्रीतही तशीच आहे.
पण आज आहेत आपल्याभोवती,
सुखदु:खाच्या चार भिंती,
आपल्या छोट्याशा  विश्वाची,
आपल्यापुरती समाप्ती.
या वात्सल्य विश्वात  ,
रांगतंय भविष्य आपलं
एक सुंदर गोड स्वप्नं ,
आपल्या प्रीतीला पडलेलं !
माझं एव्हढ स्वप्नं,
जरा पहाटेला कळू दे.
तुझ्या कुशीत माझ्या,
प्रेमाचा अंकुर फुलू दे.

कवी -  संजय माने , महाड .      

सोनेरी पहाट

चुरगळता पाचोळा
त्या कोमल पायांखाली
रान पाखरानाही
जाग पहाटे आली
पाहुनिया लावण्य
अवघडल्या दिशा दाही
या निर्विवाद विजयाची
पैजण देती ग्वाही
रोखला श्वास वा-याने
स्तब्ध झाल्या वृक्षवेली
उतरता वल्कले तिने
पुर्वाही लज्जित झाली
गौरकायेच्या स्पर्शाने
स्तब्धता तळ्याची हलली
वलयांकित जादूची
कंपने जळात उसळली
या नाजूक अन्यायाला
कोकीळ फोडी वाचा
बावरल्या नजरेने
वेध घेतला स्वरांचा
अधि-या रविकिरणांनी
थोडीशी आगळीक केली
जाणुनिया मर्यादा
लाजाळूची पाने मिटली .
 
       कवी - संजय माने ,महाड  

क्षण प्रीतीचे

धुंद आसमंत ....
अथांग सागर.....
ओठांच्या किना-यावर आदळणा-या ,
उसळत्या यौवनाच्या लाटा,
स्वैर मनातून भावनांना ,
अभिव्यक्तीच्या हजार वाटा.
एकमेकांत सामावण्याची
एक अनामिक ओढ,
वासनांचे वादळ ,
भावगर्भ डोळे,
जोडत होते निशब्द नाती ,
अस्तित्व विसरायला लावणा-या,
सहवासातील प्रत्येक क्षणाच ,
सार केवळ एकचं........प्रीती.
व्यापून राहिलीय जणू ,
या विश्वाच्या अंती अनंती.

कवी.- संजय माने, महाड 

Sunday, 1 January 2012

नव वर्ष स्वागताचा थरार

                                     ३१ डिसेंबर २०११ . २०१२ च्या स्वागताचा दिवस. सकाळपासून २०१२ च स्वागत कोणत्या पद्धतीन कराव याचाच विचार करत होतो. पारंपारिक पद्धतीन नवीन वर्षाच स्वागत करायचं नव्हत. आणि दारू किंवा इतर कोणतंही व्यसन नसल्यान अशा ग्रुप मध्ये मी कधीही जात नाही. अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर नव वर्षाच स्वागत समुद्रात फिरून कराव  अस नक्की केल. त्या करिता चांगल्या बोटीचा शोध सुरु झाला. कुटुंबासोबत  रात्रीचा प्रवास करायचा असल्याने मोठी बोट हवी होती. ब-याच प्रयत्नानंतर प्रवासी वाहतूक करणारी लॉंच मिळाली. हि लॉंच मिळवून देण्यासाठी धावपळ करणा-या इसमानेच आम्हाला  एक सल्ला दिला. जवळच समुद्रात एक छोटस बेट आहे तिथे तुम्हाला रात्री कार्यक्रम साजरा करता येईल अस त्याच म्हणण होत. मी ते मान्य केल. पण त्या बेटावर जाण्यासाठी आणखी एका छोट्या होडीची गरज होती. तीही त्यानेच उपलब्ध करून दिली. एव्हढंच नाही तर त्या बेटावर पूर्ण अंधार असल्याने जनरेटर आणि म्युझिक सिस्टीम सुद्धा त्यानेच उपलब्ध करून दिली.
                                      एव्हढी सगळी तयारी झाल्यावर मी घरी आणि माझ्या दोन मित्रांना माझा बेत सांगितला. त्यांनीही कुटुंबासोबत येण्याची तयारी दाखवली. मग जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची तयारी करून संध्याकाळी आम्ही श्रीवर्धन हून दिघी या गावाकडे निघालो. रात्री ९-०० वाजता आम्ही लॉंच  मध्ये चढलो. आमचा प्रवास सुरु झाला पण कुठे जायचं याची आम्हाला काहीही कल्पना नव्हती , तिथे काय आणि कशी परिस्थिती असेल याचाही अंदाज नव्हता. खलाशांच्या म्हणण्यानुसार साधारण १० मिनिटांत आम्ही बेटावर पोहोचणार होतो. सोबत छोटी होडीही होती. पण अंधारात त्यांचाही अंदाज चुकला आणि तब्बल दीड तासानंतर आम्ही त्या बेटाच्या जवळ पोहोचलो. तिथून छोट्या होडीतून त्या बेटावर एक एक जण तराफ्याने पोहोचलो. आणि तिथले वातावरण पाहून सगळेच खुश झालो. आमच्या आधीच खलाश्यांनी तिथे जाऊन जनरेटर लाऊन ट्युबलाईट चालू केल्या होत्या. चारही बाजूनी समुद्राचे अथांग पाणी आणि बेटावर आम्ही. माझ्या दिवसभराच्या मेहनतीच चीज झाल्यासारखं वाटल . समुद्रातून बोटीचा प्रवास आम्ही अनेकदा केला होता. पण समुद्रातल्या एका निर्जन  बेटावर रात्र घालवण्याचा अनुभव थरारक होता हे मात्र निश्चित .
                                     जेवण झाल्यावर डि जे चालू करून आम्ही मनसोक्त नाचलो . रात्रीचे दोन अडीच कधी वाजले   ते कळलेच  नाही. खरतर आम्ही खलाश्यांना केवळ जेवण करून निघणार असंच सांगितल होत. पण त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. उलट आणखी कशाची गरज लागणार आहे का ते विचारत होते. पण त्यांच्या चांगुलपणाचा आणखी गैर  फायदा घेणे आम्हाला बरोबर वाटले नाही. आम्ही अडीच वाजता निघालो. मात्र त्या नंतरही त्यांनी आम्हाला दिघी पोर्ट या मोठ्या बंदराचा फेरफटका मारून आणले . काहीही ओळख देख  नसताना  आमच्यासाठी दिघी गावातील  त्या आठ दहा माणसांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी राहू.
                                     परत निघताना  आम्हा सर्वांच्याच चेह-यावर भरपूर समाधान होत. नव वर्षाच्या स्वागताचा हा थरार  आम्ही कधीही विसरणार नाही हे मात्र नक्की.

------संजय माने ,महाड