Thursday, 28 March 2013

अरे गुलामा …
गुलाम मेला म्हणतो कसा ,
आती क्या खंडाला
लाज तरी कशी वाटत नाही
म्हटलं चांडाळा ?
बेकारीचा घेतलाय वसा ,
बापाचा पैसा घटवायला ,
कॉलेजला हा जातो जातो जणू ,
केवळ पोरी गटवायला
स्टायलिश कपडे , डोक्यावर टोपी ,
दाढीचे खुंट वाढलेले
बस स्टोप वरती फिरतात जसे
बोकड देवाला सोडलेले ……

कवी -- संजय माने ,महाड 

Saturday, 4 August 2012

चारोळी
स्पंदनांचे जाळे  , फेकुनी आकाशी
स्वप्नांचे थवे घे तू ,ओढुनी  उराशी
तिमिरास  तेजाची  ,दावूनी लकाकी
तुझ्या साठी उषा आली ,हास ना जराशी

----संजय माने ,महाड 

जगेन मी

हसून साह्शील सहज वेदना
दु:खlला  सुख म्हणेन मी

तू चंद्राला दिनकर म्हणशील
तुझ्यासवे "मम" म्हणेन मी    

अर्थ नवा नात्याला देशील
श्वासाविनही जगेन मी  

स्वप्नांमध्ये रंग तू भरशील
नेत्रांविनही बघेन मी   

मागून बघ तू सहज एकदा  
चंद्र धरेवर  आणेन मी

प्रीतीस म्हणते नश्वर दुनिया 
सखी तुला मग  म्हणेन मी

---संजय माने ,महाड 

Saturday, 7 January 2012

चारोळ्या

धन्य त्या शिवबाची
ज्याने प्राण देशासाठी वाहिला,
आम्ही मात्र जितेपणी
देश गुलाम होताना पाहीला.
----------------------------------------
इथल्या चिरेबंदी दगडांनी
इतिहासाची जुळणी केली,
भूखंड खाऊन पुढा-यांनी
इतिहासाची गुळणी केली.
----------------------------------------
जनतेचाच पैसा खाऊन
वर "कोण म्हणतो येणार नाय "
लोकशाहीच कवच पांघरून
कासव घेतो पोटात पाय.
----------------------------------------
कवी -- संजय माने ,महाड 

माझं स्वप्नं

मी पाहतो नेहमी
एक स्वप्नं जागेपणी
तीच तू , तोच मी ,
डोळ्यातून बोलणारी ,
स्पर्शातून फुलणारी ,
ती प्रीतही तशीच आहे.
पण आज आहेत आपल्याभोवती,
सुखदु:खाच्या चार भिंती,
आपल्या छोट्याशा  विश्वाची,
आपल्यापुरती समाप्ती.
या वात्सल्य विश्वात  ,
रांगतंय भविष्य आपलं
एक सुंदर गोड स्वप्नं ,
आपल्या प्रीतीला पडलेलं !
माझं एव्हढ स्वप्नं,
जरा पहाटेला कळू दे.
तुझ्या कुशीत माझ्या,
प्रेमाचा अंकुर फुलू दे.

कवी -  संजय माने , महाड .      

सोनेरी पहाट

चुरगळता पाचोळा
त्या कोमल पायांखाली
रान पाखरानाही
जाग पहाटे आली
पाहुनिया लावण्य
अवघडल्या दिशा दाही
या निर्विवाद विजयाची
पैजण देती ग्वाही
रोखला श्वास वा-याने
स्तब्ध झाल्या वृक्षवेली
उतरता वल्कले तिने
पुर्वाही लज्जित झाली
गौरकायेच्या स्पर्शाने
स्तब्धता तळ्याची हलली
वलयांकित जादूची
कंपने जळात उसळली
या नाजूक अन्यायाला
कोकीळ फोडी वाचा
बावरल्या नजरेने
वेध घेतला स्वरांचा
अधि-या रविकिरणांनी
थोडीशी आगळीक केली
जाणुनिया मर्यादा
लाजाळूची पाने मिटली .
 
       कवी - संजय माने ,महाड  

क्षण प्रीतीचे

धुंद आसमंत ....
अथांग सागर.....
ओठांच्या किना-यावर आदळणा-या ,
उसळत्या यौवनाच्या लाटा,
स्वैर मनातून भावनांना ,
अभिव्यक्तीच्या हजार वाटा.
एकमेकांत सामावण्याची
एक अनामिक ओढ,
वासनांचे वादळ ,
भावगर्भ डोळे,
जोडत होते निशब्द नाती ,
अस्तित्व विसरायला लावणा-या,
सहवासातील प्रत्येक क्षणाच ,
सार केवळ एकचं........प्रीती.
व्यापून राहिलीय जणू ,
या विश्वाच्या अंती अनंती.

कवी.- संजय माने, महाड